Abdul Sattar Convoy Attacked: ठाकरे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Adbul Sattar) यांचा ताफा जळगावमध्ये रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ताफा न थांबल्याने त्यांनी तात्यासमोर कापूस व खोके फेकत आपला निषेध नोंदवला. यानंतर काही काळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अब्दुल सत्तार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ते पोहोचले असता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अब्दुल सत्तार यांचा ताफा न थांबल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर कापूस व खोके फेकून देत जोरदार घोषणाबाजी केली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तब्बल ११ हजार १९२ हेक्टरवरील रब्बीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना सर्व नुकसानभरपाई दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. दुसरीकडे विरोधक मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला असून शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.