अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2024, 02:57 PM IST
अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा title=
अजित पवार गट सोडणार?

Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. लोकसभेच्या निकालानंतरपासून अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांनी तर अजित पवार गटातील काही आमदार बाहेर पडतील आणि पुन्हा शरद पवारांकडे येतील अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता आणखीन एक आमदाराने स्वत:च्या वाढदिवासानिमित्त घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिरातींमुळे हा आमदार अजित पवार गट सोडणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

त्या जाहिरातीची चर्चा

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये असतानाच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांपैकी एक असलेले दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आपल्या वाढदिवसाला शरद पवारांचे फोटो छापले आहेत. आज नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस असल्याने काही वर्तमानपत्रात शरद पवारांचा फोटो छापण्यात आला आहे तर काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीत एक रिकामा पांढरी चौकट ठेवण्यात आली आहे. ही चौकट कुणासाठी? या चौकटीत कुणाचा फोटो येणार? नरहरी झिरवाळ पण वेगळा मार्ग स्वीकारणार का? अशा विविध चर्चांना यामुळे उधाण आलं आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

दरम्यान, झिरवाळ वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वाढण्यामागील आणखी एक कारण म्हणजे त्यांनी  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी थेट ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना पाठिंबा जाहीर केला आहे. झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये गुळवेंचं काम करण्याचे आदेश दिले आहेत. 

वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट

नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली. झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळीवेगळं बर्थडे रिटर्न गिफ्ट देत थेट जाहीर पाठिंबा देण्यात आला. कौटुंबिक संबंध असल्याने आपण गुळवेंना पाठिंबा देत असल्याचं झिरवाळ यांनी जाहीर केलं आहे.

भुजबळांची नाराजी का?

दरम्यान, दुसरीकडे नाशिकचे अजित पवार गटाचे आमदार तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भुजबळ यांना लोकसभा तसेच राज्यसभा निवडणुकीमध्ये डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या भुजबळांना अगदी शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यानंतर राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठीही त्यांनी रस दाखवला होता. मात्र राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीमधून लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळेच भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.