अकोल्यात 'तीन तलाक'चा गुन्हा दाखल

 अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्यात 'तीन तलाक'चा गुन्हा नोंदविण्यात आलाय. 

Updated: Aug 23, 2019, 05:06 PM IST
अकोल्यात 'तीन तलाक'चा गुन्हा दाखल  title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्यात 'तीन तलाक'चा गुन्हा नोंदविण्यात आलाय. नुकताच भाजप सरकारने मुस्लिम महिलांना संरक्षण देणारा हा कायदा पारित केला आहे. या प्रकरणात पती आणि सासरमंडळीच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील फिर्यादी महिलेचं लग्न वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील मो.जाफर मो.तस्लीम सोबत सहा वर्षाआधी झालं होतं. या दाम्पत्याला तीन अपत्येसुद्धा आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मो. जाफर आणि सासरकडील मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. तर पती मो. जाफर हा नेहमी महिलेला तू दिसायला चांगली नाही, मी तुला सोडून देतो आणि दुसरं लग्न करतो', या प्रकारचे टोमणे मारत होता. त्यातूनच दोघांमध्ये वाद उमटायचे.

काही महिन्यापूर्वी तक्रारदार महिला कंटाळून आपल्या माहेरी परत आली. काल दोन्ही पक्षांमध्ये आपसात समझोता होणार होता मात्र समझोता न होता वाद विकोपाला गेला आणि मो.जाफर ने सर्वसमक्ष पत्नीला 'तुझे तलाक दिया' हे वाक्य तीनदा बोलून गैरकायदेशीररिते तलाक दिला. 

याप्रकरणी महिलेने बाळापूर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पती मो. जाफर त्याची बहीण, आई-वडील अन्य एक नातेवाईक असे एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.