अकोला : आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. धुळे ते अमरावती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणासाठी भूमिसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रकल्पात बाळापूर तालूक्यातील बाभुळखेड, व्याळा, रिधोरा, सातरगांव, कास्तखेड, कासारखेड, मांडोली, भिकुंडखेड, शेळद, कान्हेरी या गावांतील ११४ शेतकर्यांची शेती गेली आहे.
या चार वर्षात या शेतकऱ्यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत सरकारी कार्यालयाचे आणि नेत्यांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना उपेक्षाच मिळाली. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. पण वेळ आल्यावर त्यांच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या शेतकऱ्यांवर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून दोन शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे..