Akshay Shinde Encounter Hearing What Argument Happened In Bombay High Court: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेंचा सोमवारी (23 सप्टेंबर रोजी) मुंब्रा बायपासजवळ एन्काऊन्टरमध्ये मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असता स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. मात्र अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या एन्काऊन्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज पहिल्यांदा सुनावणी झाली. या सुनावणीत नक्की काय युक्तिवाद झाला? न्यायालयाने कोणते तीन अहवाल मागवले आहेत यासंदर्भात जाणून घेऊयात 10 पॉइण्ट्समध्ये...
याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांवर प्रश्नाचा भडीमार केल्याचं सुनावणीदरम्यान पाहायला मिळालं. न्यायालयाने पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांना अनेक प्रश्न विचारले. यामध्ये अगदी आरोपीला कधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं इथपासून ते पिस्तूल अनलॉक का होती इथपर्यंत प्रश्नांची सरबत्ती कोर्टाने लावली.
याचिकेवर सुनावणी सुरु झाल्यानंतर पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनी, "घटनेनंतर 25 मिनिटांमध्ये जखमींना कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले," असं सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपीवर गुन्हा कधी दाखल झाला? त्याला रुग्णालयात कधी नेण्यात आलं? शवविच्छेदन केव्हा करण्यात आलं? यासंदर्भातील माहिती सरकारी वकिलांना विचारण्यात आली.
"पिस्तूलवर आरोपीच्या हाताचे ठसे आहेत का?" यासंदर्भातील अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले आहेत. तसेच "आरोपीने जर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातील एक गोळी पोलिसाला लागली तर बाकीच्या दोन गोळ्यांचं काय झालं?" असा प्रश्नही न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला.
फायर करण्यात आले ते पिस्तूल होते की रिव्हलवर? असा प्रश्न न्यायालयाने विचारला असता सरकारी वकिलांनी पिस्तूल होतं अशी माहिती दिली. त्यावर न्यायालयाने, "पिस्तूल लोड केलेलं होतं का? ते कसे लोड करण्यात आले? पिस्तूल लॉक का केलेले नव्हते? ऐवढा निष्काळजीपणा का केला?" असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला.
पोलिसांनी गोळ्या झाडताना हातावर पायावर गोळ्या झाडायला पाहिजे होत्या, असं न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं. "ज्या पोलीस आधिकाऱ्याने गोळी मारली त्याने कमरेच्या खाली गोळी मारायला पाहिजे होती. ते कितीच्या बॅचचे अधिकारी आहेत?" अशी विचारणा न्यायलयाने केली आहे.
तसेच गाडीमध्ये "चार पोलीस आसताना तो आक्रमक कसा झाला?" असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे.
"जप्त केलेली हत्यारे व शास्त्रे तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवली आहेत का?" असा प्रश्न न्यायालयाने सरकारी पक्षाला विचारला.
आरोपीला बुरखा घालण्यात आला होता का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला असता, सरकारी वकिलांनी, "डीसीपी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर बोलत आहेत," असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
प्राथमिक बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने, "संबंधित पोलीस अधिकारींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा एन्काऊन्टर नाही. एन्काऊन्टर वेगळा असतो. याला एन्काऊन्टर कसं म्हणणार?" असा सवाल उपस्थित केला.
> न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा सीलबंद अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
घटनेत सहभागी सर्व पोलिसांचा सीडीआर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
अक्षय शिंदेने पिस्तूलने गोळीबार केल्याच्या दाव्यानंतर न्यायलयाने, "पिस्तूलवर आरोपीच्या हाताचे ठसे आहेत का?" असा सवाल विचारत याचसंदर्भातील अहवाल पुढील सुनावणीमध्ये सादर करण्याचा आदेशही सरकारी वकिलांना दिला आहे.
सीडीआर हा फोनवरुन करण्यात आलेले तसेच रिसिव्ह केलेल्या कॉलसंदर्भातील डेटा असतो. या एन्काऊन्टर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षकाने एका कॉलबद्दल सांगितलं होतं. आपण व्हॅनमध्ये पुढील बाजूस ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. त्यावेळी मागे बसलेल्या एका कनिष्ठाने फोन आपल्याला फोन केला. अक्षय शिंदे शिवीगाळ करतोय असे त्याने सांगितले. यानंतर आपण व्हॅन थांबवून मागे जाऊन बसलो असे निरीक्षकाने म्हटले होते. कोर्टाला याची खात्री करून घ्यायची असावी. सोबतच, पोलीस कुणाच्या संपर्कात होते याची शहनिशा देखील करून घ्यायची आहे.
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी पुढील सुनावणी गुरूवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.