Maharashtra Politics : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. बारामतीकरांनी सध्या याचा चांगलाच अनुभव येत आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. यामुळे पावर कुटुंब देखील विभागले गेले. बारामतीत नणंद भावजय यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. सुप्रिया सुळे या निवडणुकीत विजयी झाल्या. पराभूत होऊनही सुनेत्रा पवार खासदार बनल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. दोन गटात विभागले गेलेले पवार कुटूंब बारामतीत पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं... वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार आज तुकोबांच्या पालखीत आमनेसामने आल्या... संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये विसावला. या सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या दोघीही उपस्थित होत्या. पालखी सोहळा विसावल्यानंतर समाज आरती होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना हात दाखवून त्यांचं लक्ष वेधलं... आरतीला या तुम्ही... असं म्हणत त्यांना बोलावलं... यावेळी आरतीला सुप्रिया सुळेंची आई प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजयी एकमेकींच्या विरोधात लढल्या होत्या... मात्र वारीमध्ये एकत्र येताना राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं दोघींनीही दाखवून दिलं...