कार्यालयासमोर उपोषणाची धमकी देणाऱ्या नवरदेवास महावितरणचा 'शॉक'

महावितरणच्या कामाचा निषेध म्हणून निखिल अरुण तिखे आणि पूजा लंगडे यांनी कार्यालयासमोरच विवाह करण्याची योजना 

Updated: Jul 20, 2019, 08:35 AM IST
कार्यालयासमोर उपोषणाची धमकी देणाऱ्या नवरदेवास महावितरणचा 'शॉक' title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : अमरावती महावितरणच्या कामाचा निषेध म्हणून निखिल अरुण तिखे आणि पूजा लंगडे यांनी कार्यालयासमोरच विवाह करण्याची योजना आखली होती. या लग्नाला त्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त, यांनाही निमंत्रण पाठवले. पण आता लग्नाच्या तयारित असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला. उपोषण मंडपात लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच त्याहुन अधिक कठोर करवाई सुद्धा होउ शकते असा धमकिवजा 'समज' कंपनीने दिला. यानंतर निखिल तीखे यांनी आपले लग्न आपल्या पूर्वीच्या नियोजित स्थळीच उरकले.

बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत महावितरणचे सात कर्मचारी ९ जुलैपासून उपोषणाला बसले. त्यातलाच एक निखिलही होता. आता उपोषण लांबल्यामुळे त्याला घरी किंवा मंडपात जाणे शक्य नाही. त्यामुळे उपोषणाच्या ठिकाणीच त्याचे शुभमंगल करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. उपोषण मंडपातच त्याला हळद लावण्यात आली आणि शुक्रवारी याच मंडपात त्याचे दोनाचे चार होणार होते. पण महावितरणने आपला सरकारी खाक्या दाखवत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.  

मात्र महावितरणतर्फे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन मिळाल्याने उपोषण मंडपातील लग्न सोहळा स्थगित करण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षानी सांगितले. तर महावितरणतर्फे वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन याबाबत निर्णय होईल. अद्याप कुठाल्यही प्रकारचे आश्वासन उपोषण करणाऱ्याना दिले नसल्याचे महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उपोषण मंडपात लग्न होणार असल्याचे समजताच महावितरणतर्फे एक पत्रक काढून उपोषणकर्त्यांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे सध्या लग्न नियोजित स्थळीच झाले असले तरी येणाऱ्या दिवसांत नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.