वाळू माफियांची दादागिरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

 भातकुली तालुक्यातील पेढी नदीत हा धक्कादायक प्रकार 

Updated: Oct 1, 2020, 10:50 AM IST
वाळू माफियांची दादागिरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अनेक रेतीघाटंचे लिलाव न झाल्याने वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी नदी पात्रात गेलेल्या नायब तहसिलदार यांच्या अंगावर थेट वाळू माफियांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पेढी नदीत हा धक्कादायक प्रकार  घडला आहे. 

यात सुदैवाने नायब तहसीलदार थोडक्यात बचावले असून तीन वाळू माफिया विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पेढी नदी मधून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मिळाली होती. 

त्याआधारे नायब तहसीलदार हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नदीपात्रात ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेले असतांना. अवैध्य वाळु घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर ला नायब तहसीलदार यांनी थांबवले असता त्याने थेट तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान यात सुदैवाने नायब तहसीलदार विजय मांजरे हे थोडक्यात बचावले असून ट्रॅक्टर चालकांनी तिथून पळ काढला त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सुरज नागमोते विनोद पवार आण मयूर भातकुलकर या तीन वाळू माफियांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

अमरावती जिल्ह्यात यावर्षी चांगला दमदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा झाला आहे. परंतु अनेक रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया रेतीची चोरी करताना चे दिसून येत आहे.