टायर फुटून नाहीतर 'या' कारणामुळे झाला भीषण अपघात; बुलढाणा अपघाताबाबत RTO चा मोठा खुलासा

Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला आणि वेळातच प्रवाशांसह ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. या अपघातानंतर आता विविध कारणे समोर येत आहेत. मात्र अमरावती परिवहन विभागाने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 1, 2023, 07:02 PM IST
टायर फुटून नाहीतर 'या' कारणामुळे झाला भीषण अपघात; बुलढाणा अपघाताबाबत RTO चा मोठा खुलासा title=
(फोटो सौजन्य - PTI)

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : बुलढाण्यातील सिंदेखड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या (Bus Accident) भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपुरवरुन ही विदर्भ ट्रॅव्हल्स ही बस समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) पुण्याकडे येत होती. मात्र शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसचा टायर फुटल्याने महामार्गाच्या पुलावरील दुभाजकाला धडकली. या धडकेनंतर बसमधील डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. काही क्षणातच बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अमरावती परिवहन विभागाने (Amravati RTO) या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली.

अमरावती परिवहन विभागाने काय सांगितलं? 

ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार ही बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चालकाच्या उजव्या बाजूचे चाक दुभाजकावर आदळले. यामुळे बसचे एक्सेल तुटले आणि बसचा डिझेल टँक फुटला. बसचे एक्सेल तुटल्यामुळे बस सिमेंट रोडवरून घसरत गेली. त्यानंतर आधीच गरम असलेल्या इंजिन ऑइलने पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बसणे पेट घेतला. बस डाव्या बाजूने उलटल्याने बसचे इमर्जन्सी दरवाजे उघडता आले नाहीत. 

महत्त्वाची बाब म्हणजे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीयांना कुठेही आढळले नाही. कारण कुठेही टायरचे तुकडे पडलेले दिसले नाहीत. तसेच अतिवेगामुळे अपघात झाल्याचे देखील कुठेही आढळले नाही. ही बस रात्री 11.08 मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि 1.32 मिनिटांनी हा अपघात झाला. या बसने 152 किलोमीटर अंतर दोन तास 24 मिनिटांमध्ये पार केले होते. तर बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रति तास होता.

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात स्थळाची जाऊन पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती दिली. "आज सकाळपासूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धावती बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, त्यांनतर बसला आग लागली, असं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. रिपोर्टमध्येही तेच नमूद केलं आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.