मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी एक आरोप, कायदेशीर अडचणी वाढल्या

ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी आरोप कऱण्यात आला आहे. या नव्या आरोपामुळे मंत्री मलिक यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.  

Updated: Mar 5, 2022, 04:08 PM IST
मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी एक आरोप, कायदेशीर अडचणी वाढल्या title=

नागपूर : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे बंधू संजय वानखेडे यांनी आरोप केलाय. पोलिसांनी त्यांच्या आरोपाची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

मंत्री नबाव मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय अनुसूचित जातीचे नाहीत तर ते मुस्लिम आहेत असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्त्यव्यामुळे आमच्या कुटुंबाचा अपमान झाला आहे. त्यामुळे मलिक यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी संजय वानखेडे यांनी मागणी केली होती.

संजय वानखेडे यांनी वाशिम पोलिस ठाणे गाठून तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संजय वानखेडे यांनी वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने नवाब मलिक यांना नोटीस बजावली.

वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला नवाब मलिक यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले. माझ्या विरोधात ॲट्रॉसिटीचे प्रकरण होत नसल्यामुळे वानखेडे यांची याचिका रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती. 

नागपूर खंडपीठाने यावर सुनावणी देताना संजय वानखेडे यांची वाशिममधील याचिका रद्द करण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वानखेडे यांच्या याचिकेवरील वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.