अंजली दमानिया यांना अखेर अटक वॉरंट

खडसेंच्या बदनामी प्रकरणी रावेरचे भाजप तालुक्याध्यक्षांनी दमाणियांविरोधात कोर्टात खटला दाखल केलाय. 

Updated: Apr 13, 2018, 07:57 PM IST

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने अखेर आज अटक वॉरंट बजावलं आहे. दमानिया यांच्यावर मुंबईत २ वेळा कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं, त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळं यापूर्वी त्या कोर्टाच्या तारखांना हजर राहू शकल्या नव्हत्या, याबाबत दमानिया यांच्या वकिलांनी कोर्टाला याबाबत कागदपत्रे सादर केल्यानं, कोर्टानं यापूर्वी दोनदा दमानिया अटक वॉरंट रद्द केलं होत. 

मात्र आजच्या तारखेला दमानिया या स्वतः किंवा त्यांचे वकीलही हजर नव्हते. यामुळं अखेर न्यायालयानं दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. यामुळं दमानिया यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. खडसेंच्या बदनामी प्रकरणी रावेरचे भाजप तालुक्याध्यक्षांनी दमाणियांविरोधात कोर्टात खटला दाखल केलाय.