Ashadhi Wari 2022 : 'माऊली, माऊली' च्या गजरात ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मुक्कामी

रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला.

Updated: Jun 25, 2022, 07:07 AM IST
Ashadhi Wari 2022 : 'माऊली, माऊली' च्या गजरात ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मुक्कामी title=

विशाल सवणे, झी 24 तास, सासवड : पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामात नंतर पुणेकरांचा  निरोप घेवून माऊलींची पालखी संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरीकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट सहज पार केला . माऊलींच्या पालखीचे सासवड करांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला. 

नित्यनेमाने पहाटे श्रींची विधीवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर माऊली  सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला. शिंदेछत्री येथे माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या दर्शनासाठी हजारो वानवडी,  हडपसर परिसरातील भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. विविध संस्था , संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. 

हडपसरमध्ये सुमारे तास विश्रांती घेऊन सोहळा वडकीनाल्याकडे मार्गस्थ झाला. पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती. हडपसर ते वडकी या वाटचालीत अरुंद रस्ता व पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने वारकऱ्यांना वाटचालीत त्रास झाला. त्यातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाने काही वेळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. 

दुपारी २ वाजता सोहळा वडकी येथे पोहोचला. वडकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अरुण गायकवाड, उपसरपंच दिलीप गायकवाड, ग्रामसेवक माधव वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलीसह सोहळ्याचे स्वागत केले.
 
वडकी येथून दुपारी ३ वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला. साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला. रथाला वडकी, फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या. टाळ मृदुगांचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास  सुरुवात केली. 

या सोहळ्या बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वैष्णवासंगे घाट चढण्याचा आनंद लुटला. पाऊस पडून गेल्याने वातावरण उत्साही होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात टाळ मृदुंगासह विठ्ठल नामाचा जयघोष दुमदुमत होता. सात किलोमीटरचा दिवेघाट पार करुन अश्वांसह माऊलींचा सोहळा सायंकाळी ५ वाजता झेंडेवाडीफाटा येथे पोहोचला. हा दिवे घाट सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांसह चालत पार केला.  

भाग गेला शीण गेला , 
अवघा झालाशी आनंद || 

असं म्हणत अवघड  दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला. या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांनी घाटातील वाहनं पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली. त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला. माऊलीसह वैष्णवांनी  झेंडेवाडी फाट्यावर विसावा घेतला. पालखी सासवड मुक्कामी पोहचल्यानंतर समस्त वारकऱ्यांनी सोपानकाकांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.