Ashadhi Wari 2023: आषाढी वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी उत्सव. भक्त विठू रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपुराची वाट धरतात. आषाढी एकादशीला मोठा जनसमुदाय यावेळी पंढरपुरात दाखल झालेला पहायला मिळतो. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा केल्यानंतर त्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना एक दिवस का होईना दिलासा मिळणार आहे.
व्हीआयपी नावाखाली अनेक हौसे नवसे दर्शनाला येत असतात. त्यामुळे रांगेतील सर्वसामान्य भाविकाला त्रास होतो. याचा विचार करून एकादशी दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत पालक मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समधान आवताडे यांनी आज पंढरपूरमधील आषाढी वारीचा आढावा घेत पाहणी केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
आणखी वाचा - पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
दरम्यान, तुकोबांची पालखी 10 जून 2023 रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. 20 जून रोजी बेलवडी येथे तुकोबा महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सोहळा पार पडेल. तर त्याच दिवशी चांदोबाचा लिंब येथे ज्ञानोबा मावलीचं उभं रिंगण सोहळा पार पडेल.
दरवर्षी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्याला तरुणाईचीही हजेरी असते. कामाच्या व्यापातून तुम्हीही पालखी सोहळ्यासाठी जाऊ इच्छिता तर, माऊलींच्या पालखीत 16 जूनला जेजुरीत, 18 जून रोजी नीरा स्नानासाठी हजेरी लावू शकता. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातही तुम्ही काटेवाडी येथील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याला होणार आहे.
यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल. 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.