जालन्यात भाजपा उमेदवारासमोर शिवसेनेच्या बंडखोरांचे तगडे आव्हान

 भाजपा उमेदवार कुचे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Updated: Oct 5, 2019, 03:48 PM IST
जालन्यात भाजपा उमेदवारासमोर शिवसेनेच्या बंडखोरांचे तगडे आव्हान title=

जालना : जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेने दावा केला होता. पण हा मतदार संघ शिवसेनेला न सुटल्याने शिवसेनेच्या 2 स्थानिक नेत्यांनी भाजप उमेदवार नारायण कुचेंविरोधात बंडखोरी करत तगडं आव्हान उभं केले आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार कुचे यांची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे गावोगावी फिरून प्रचार करत असले तरीही कुचे यांना ही निवडणूक सोपी राहिली नाही. कारण शिवसेनेच्या या गडात 2014 साली भाजपा लाटेत अवघ्या 15 दिवसांत कुचे आमदार बनले. पण आता शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठं मतविभाजन होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे स्थानिक नेते राजू अहिरे यांनी शहरातून रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल तर केलाच पण या मतदार संघातून निवडून येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरप्राईज देऊ अशी कोपरखळी भाजपा उमेदवाराला मारली आहे. तर शिवसेनेचेच दुसरे स्थानिक नेते राजेंद्र भोसले यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे कुचेंसमोर दोन बंडखोरांनी तगडं आव्हान उभं केले आहे.

असं असलं तरीही मला कोणतीही चिंता नाही, मतदार संघात केलेल्या कामांच्या जोरावर मी पुन्हा निवडून येईन असा दावा कुचे यांनी केला आहे. गेल्या 5 वर्षात कुचे यांनी शिवसेनेला या मतदार संघात डावलल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक कुचे यांच्या विरोधात गेला आहे. आता या बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपा काय उपाय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.