Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसंच यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट 'नायक'संबंधीही (Nayak) चर्चा केली. या चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांना त्यांच्या लहानपणीची स्वप्नं तसंच नायक चित्रपट पाहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली का? अशी विचारणा करण्यात आली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की. "चित्रपट हा चित्रपट असतो, सत्यात असं काही होत नसतं, त्यामुळे असं काही नाही". यावेळी एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात अनिल कपूर ज्याप्रकारे फटाफट निर्णय घेऊन सर्व समस्या सोडवतो ते आवडलं असल्याचं म्हटलं.
"मी शाखाप्रमुख पदापासून माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द सुरु केली. तेव्हापासून मी फार मेहनत घेत आहे. जे काम मी स्विकारतो किंवा करण्याचा विचार करतो, ते काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. मी पूर्ण आत्मसमर्पण देऊन काम करत असतो. त्यात श्रद्धाही असते. त्यामुळे मी हे काम कधी होईल, मला माहिती आहे, हे पद हवं आहे असा विचार केला नाही. मी काम करत गेलो आणि जनतेची सेवा करणं मला आधीपासून आवडतं. माझे गुरु आनंद दिघे यांच्यासह मी काम केलं असून, जनता आणि त्यांची सेवा याची मला आवड आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मनिष पॉल याने एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत तुम्हीही नायक चित्रपटाप्रमाणे रस्त्यावर उतरुन काम करता असं म्हटलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करत आहे असं नाही. पण जमिनीवर जी स्थिती आहे ती तिथे गेल्यावरच कळते. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला सत्यस्थिती समजत नाही. मी तळागाळातून वर आलो आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. खाली जमिनीवर उतरुन काम करणं मला आवडतं. कार्यालयात बसून तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता. तिथे गेल्यानंतर माहिती घेऊन लगेच कारवाई करता येते. लोकांनाही नैतिक आधार मिळतो. मी समस्या संपवत असल्याने लोकांनाही बरं वाटतं".
"पाऊस सुरु होण्यापूर्वी नाल्यांची सफाई होते. आम्ही जिथे पाणी साचतं त्या जागांची माहिती घेतली. यानंतर आयुक्तांना एक योजना आखण्यास सांगितलं. जिथे पाणी साचणार नाही तेथील अधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं ठरवलं. पण जर साचलं तर कारवाई केली जाईल असंही सांगितलं," असं एकनाथ शिंदे म्हणाले.