कल्याण : शिवसेना भाजपा युतीची घोषणा झाली असून काही जागांची अदलाबदलीही करण्यात आली आहे. भाजपाचे कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कापण्यात आला आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. त्या बदल्यात बेलापूरची जागा शिवसेनेनं सोडली आहे. तसेच ठाणे शहर ही जागा शिवसेनेला मिळते की पुन्हा भाजपाकडेच राहते हे अजून गुलदस्त्यात आहे.
प्रचंड विरोध आणि दबावतंत्रानंतर कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेनं भाजपाकडून आपल्याकडे खेचून आणला खरा...मात्र त्यानंतरही शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय. कारण कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढण्यासाठी जे उमेदवार इच्छुक होते त्या अकरा उमेदवारांऐवजी पक्षाकडून बाहेरच्या उमेदवाराचा विचार केला जात असल्याची माहिती समोर येतेय.
त्यामुळे कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांचा हिरमोड झालाय.
त्यांनी आता बाहेरच्या उमेदवारालाही परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचं नाव कल्याण पश्चिमसाठी पुढे येत असून त्यामुळे इथल्या स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी पसरलीय. यासाठी हे सर्व इच्छुक प्रकाश पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.