उजनीचे पाणी तात्काळ उपलब्ध करून द्या, सुशीलकुमार शिंदेंची मागणी

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सभा

Updated: Oct 18, 2019, 08:32 AM IST
उजनीचे पाणी तात्काळ उपलब्ध करून द्या, सुशीलकुमार शिंदेंची मागणी  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : सरकारने तात्काळ पाऊलं उचलून लातूरला उजनीचे पाणी तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. ज्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सभा झाल्या. लातूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई असून उजनी धरणाच्या पाण्याची जुनी मागणी लातूरकरांची आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उजनी धरणातून ०२ टीएमसी पाणी लातूरला मिळावे यासाठी मोठे प्रत्यन केले होते. मात्र उजनीच्या पाणी लातूरला मिळू नये म्हणून मोठं राजकारण झाल्याचा खुलासा यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही असा सवालही यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला. 

'पक्ष एकत्र येतील' 

'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं सोलापुरात केलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यानंतर यावर विरोधकांमधून फार टीका झाली होती. सुशील कुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले होते.