...म्हणून ठाकरे-शहांनाही खांद्यावर घोंगडं अन् हातात काठी घ्यावी लागली

खरं तर २०१४ साली सत्तेत येण्यापूर्वी भाजपानं धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं

Updated: Oct 11, 2019, 01:36 PM IST
...म्हणून ठाकरे-शहांनाही खांद्यावर घोंगडं अन् हातात काठी घ्यावी लागली  title=

मुंबई : राज्यातल्या किमान ३६ मतदारसंघांमध्ये धनगर मतं निर्णायक आहेत. गेल्या निवडणुकीत दिलेलं आरक्षणाचं आश्वासन पूर्ण झालं नसल्यानं धनगर मतदार युतीपासून दुरावणार नाही, याची खटपट दोन्ही पक्षांचे नेते करताना दिसत आहेत. सांगली जिल्ह्यात जतमध्ये झालेल्या सभेत अमित शाह यांना असं घोंगडं देण्यात आलं. त्यांनी ढोलही वाजवला... कारण उघड आहे... जतमध्ये धनगर मतं निर्णायक ठरणार आहेत आणि हा मतदार भाजपाला दूर जाऊ द्यायचा नाही.


अमित शाहांच्या हातात काठी, खांद्यावर घोंगडी 

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जवळपास ३६ मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे सत्ताधारी पक्ष या समाजाला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

त्यामुळेच उद्धव ठाकरेंनीही काठी नी घोंघडं घेऊन निवडणुकीच्या जत्रेत जाण्याचं ठरवलं आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आणि हरीभाऊ राठोड यांचा पाठिंबा मिळवला. उद्धव ठाकरेंनीही थेट दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून धनगर आरक्षणाचं आश्वासन देऊन टाकलं.


उद्धव ठाकरेंच्या हातात काठी, खांद्यावर घोंगडी 

खरं तर २०१४ साली सत्तेत येण्यापूर्वी भाजपानं धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. धनगर समाजाला एकत्र आणणारे महादेव जानकर पाच वर्ष मंत्री असतानाही प्रश्न प्रलंबित आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याचं सांगण्यापलिकडे सरकार काहीच करू शकलेलं नाही. धनगर समाज अद्याप जानकर आणि पर्यायानं भाजपासोबत आहे. शिवाय उद्धव ठाकरेंनीही धनगर आरक्षणाचं भिजत घोंगडं आपल्या खांद्यावर घेतलंय. आता याचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा होतो हे बघायचं.