आदित्य ठाकरे यांच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

२०१० पासून युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी काम करण्यास सुरूवात केली. 

Updated: Oct 3, 2019, 09:12 AM IST
आदित्य ठाकरे यांच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

मुंबई : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मराठीबहुल वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा सुरक्षित मतदारसंघ आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांना पक्षात घेवून शिवसेनेने वरळीत विरोधकच शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे वरळी विधानसभा बिनविरोध करण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरु आहेत. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने शिवसेनेसाठीही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

आदित्य ठाकरे हे २९ वर्षांचे असून सेंट झेवियर्स कॉलेजमधून इतिहास विषयातून पदवीधर, तर के सी लॉ कॉलेजमधून एलएलबी उत्तीर्ण आहेत. २०१० पासून युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी काम करण्यास सुरूवात केली. तर २०१२ ला दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार दिल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. २०१७ मध्ये मुंबई जिल्हा फूटबॉल असो. अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर २०१८ मध्ये वरळी इथं शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. 

कविता लिहण्याचा त्यांचा छंद अनेकांना माहीत आहे.  २००७ मध्ये म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा 'माय थॉटस इन ब्लॅक अँड व्हाईट' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहलेल्या गाण्यांचा एक अल्बमही प्रसिद्ध आहे. आदित्य यांना खेळ आणि फोटोग्राफीतही विशेष रस आहे. 

मितभाषी आणि तरूणाईला आकर्षित करणारे व्यक्तिमत्व असलेले आदित्य ठाकरे सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यांना मुंबईतील प्रश्नांची चांगली जाण असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आदित्य संवांद कार्यक्रम गाजला. ५१४५ किमी प्रवास करत १११ विधानसभा मतदारसंघातून जन आशिर्वाद यात्रा काढली. राजकारणात असूनही टिका करण्यावर ते भर देत नाहीत.