HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई

HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. 

Updated: Oct 9, 2020, 05:56 PM IST
HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई  title=
संग्रहित छाया

मुंबई : HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. लढाऊ विमानांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला मुंबईत अटक करण्यात आली आहे. हा हेर हिंदुस्तान एरॉनॉटीक्स लिमिटेडचा Hindustan Aeronautics Limited (HAL) कर्मचारी आहे. दीपक शिरसाठ नावाच्या हेराला अटक करण्य़ात आली आहे. आयएसआयला हा लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती पुरवण्याची हेरगिरी हा कर्मचारी करत होता. 

नाशिक एटीएसला या व्यक्तीची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर सातत्याने पाळत ठेवली होती. मुंबईत या व्यक्तीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याला १० दिवसांची एटीएस कोठडी देण्यात आली आहे. शिरसाठ याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन मोबाइल हँडसेट, पाच सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आली आहेत. 

भारतीय लष्कराचे प्रमुख केंद्र असलेल्या नाशिक येथील देवळाली कॅम्पच्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवल्याची घटना या आधी घटली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीतील एका कर्मचार्‍याने विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला दिली. याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिकमधील एक व्यक्ती परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची आणि त्या संबंधित संवेदनशील माहिती आणि एचएएल या विमान कारखान्यासंदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्तीस पुरवत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या  (एटीएस) नाशिक युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चौकशी केली. ओझर येथील एचएएल कारखान्यातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाने संशयित एचएएल चा कर्मचारी दीपक शिरसाट याला मुंबईतून अटक केली.