कल्याण : शुक्रवारी कल्याण स्टेशनला नक्षलवादी संघटनांशी संबंधित काही संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकास मिळाली होती.
एटीएसने सर्व ठिकाणी शोध घेत एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सीपीआय (माओ) या संघटनेशी संबंधित दस्तावेज आणि आक्षेपार्ह लिटरेचर तसेच बॅनर आढळून आले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान सविस्तर चौकशीनंतर या संशयिताने सर्व बाबींचा खुलासा केला. मुंबईतील कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी भागात राहणारे आपले सहकारी सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याचे या संशयिताने चौकशीत सांगितले आहे.
कल्याण स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
तर कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी राज्यात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले होते.
या सर्व घटनांमध्ये या संघटनेचा किंवा या सात जणांचा हात होता का, याचा तपास आता एटीएसकडून केला जात आहे.