...आणि 'त्या' दोघींना पुन्हा स्त्रीत्व बहाल

 दक्षिण भारतातील दोन मुलींनी फँमिलियल स्वाक्यर सिंड्रोम या आजाराशी लढा दिला आहे.

Updated: May 30, 2019, 04:37 PM IST
...आणि 'त्या' दोघींना पुन्हा स्त्रीत्व बहाल  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : त्या दोघी स्त्री म्हणून जन्मल्या मात्र आपल्या शरीराची वाढ पुरुषांप्रमाणे सुरु असल्याचे तारुण्यात लक्षात आले. त्या दोघींसह त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा झटका होता. त्यानंतर स्त्रीत्व मिळवण्यासाठीची त्यांची पुन्हा धडपड सुरु झाली. त्यातून आता विज्ञानाच्या किमयेनं त्यांना पुन्हा स्त्रीत्व बहाल झाले आहे. दक्षिण भारतातील दोन मुलींनी फँमिलियल स्वाक्यर सिंड्रोम या आजाराशी लढा दिला आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे.

अगदी बालपणापासूनच त्या मुली म्हणून वाढल्या, सर्वसामान्य घरातल्या या मुली अगदी लाडात वाढल्या,  मात्र जसं जंसं वय वाढत होतं तसे शरीरात काही बदल झपाट्यानं होत होते. मात्र होणारे हे बदल स्त्रिसारखे नसून पुरूषांसारखे होत होते. पुरुषांप्रमाणे शरीराची वाढ होत असल्याने मानसिक कुंचबना होत होती. मात्र न्युनगंडामुळं कुणात मिसळणसुद्धा शक्य होत नव्हत. त्यांना अत्यंत दुर्मिळ असा फँमिलियल स्वाक्यर सिंड्रोम हा आजार होता. या आजाराला लिंगसंभ्रम असेही म्हणतात. या आजारात रुग्णाचे गुणसूत्र पुरुषांप्रमाणे असतात. मासिक पाळी न येणे, स्तनांची वाढ न होणे, आवाज पुरूषी होणे असे बदल या आजारात होत असतात. संपूर्ण देशात आतापर्यंत फक्त 70 जणांना हा आजार आढळून आला आहे.

मुलींना लिंगसंभ्रम झाल्याने पालकांवर जणू दुखाचा डोंगर कोसळला होता.  त्यातून तात्काळ मार्गही निघाला. समाज माध्यमांच्या माध्यमातून त्या औरंगाबादेतील एका डॉक्टरचा पत्ता मिळाला आणि त्यातून या दोन्ही मुलींवर अवघड अशी शस्त्रक्रीया झाली. शरीरातील हार्मोन बदल आणि लिंग बदलाची यशस्वी शस्त्रक्रीया करून या मुलींना पुन्हा स्त्रित्व मिळाले आहे. मुलींच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. मात्र तरीसुद्दा सगळी सोय झाली, माणुसकी असणारे हात मदतीला धावले आणि सर्व प्रश्न सुटत गेले. 

मैत्रिणींमध्ये मिसळता येत नव्हतं, आयुष्यंच कठीण झालं होतं, नियतीनं खेळ केला वाटत होतं,  मात्र शस्त्रक्रियेनंतर पुन्हा साधं आयुष्य जगता येईल याचा आनंद असल्याची प्रतिक्रीया यातील एका मुलीने दिली आहे. दुर्मिळ आजार असल्याने, हार्मोनलथेरपी करायची असल्याचे उपचारातही बरीच अडचण होती. मात्र उपचारानंतर आता त्यांच्यात सकारातम्क बदल सुरु झाले आहेत.  दोघींच्या गर्भाशयाची आणि स्तनांची वाढसुद्धा होईल आणि त्या समान्य आयुष्य जगतील असे डॉ. संदिप हंबर्डे पाटील यांनी म्हटले आहे.