Manmohan Singh Memorial Congress vs BJP Politics: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधीच त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. आज दिल्लीतील निगमबोध घाटावर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी काँग्रेस मुख्यालयात सकाळी 8.30 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 8 वाजता मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानातून काँग्रेसच्या मुख्यालयात आणले जाणार आहे. जिथे सामान्य जनतेबरोबरच काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 8:30 ते 10.00 या वेळेत अंतिम दर्शन घेतील. यासंदर्भातील नियोजन सुरु असतानाच मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरुन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये खटके उडल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसं पत्रही लिहिलं आहे. तसेच खरगे यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोनवरही यासंदर्भात सांगितलं आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतील त्या ठिकाणीच माजी पंतप्रधानांचं स्मारक उभारावं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असं खरगेंनी म्हटलं आहे. दुसरीकडे सिंग यांच्या स्मारकास जागा न देणे हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अपमान ठरेल, असं विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं आहे. अकाली दलाचे सुखबिरसिंग बादल यांनी सिंग यांच्या स्मारकास जागा दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनेही उघडपणे यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी, "माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही. हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान आहे," असं म्हटलं आहे.
या आरोपांवर भारत सरकारनेही उपली भूमी स्पष्ट केली आहे. "आज सकाळी, माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची विनंती सरकारला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांकडून मिळाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच, गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सरकार स्मारकासाठी जागा देईल. दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता होऊ शकतात कारण एक ट्रस्ट बनवावा लागेल आणि त्याला जागा द्यावी लागेल," असं सरकारने म्हटलं आहे. आता काँग्रेसकडून केले जात असणारे आरोप आणि सरकारची भूमिका समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेस मनमोहन सिंगच्या मृत्यूवरुन राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.