विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालाय. यावर्षीही पावसानं दडी मारल्यानं पेरणी केलेला खर्चही वाया जाणार असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. मात्र असं असली तरी त्याचा प्रामाणिकपणा कायम आहे.
वयाची पन्नाशी पार केलेले औरंगाबादच्या नाचनवेल गावातले शेतकरी सोमनाथ दळवी यांच्याकडे 4 एकर जमीन आहे. त्यावरच त्यांचा घरगाडा चालतो. सोननाथ यांना दोन मुलं आहेत. दोघेही लष्करात भरती झालेत. सोमनाथ आणि त्यांची पत्नी शेती करून घर चालवतात.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोमनाथ दळवी यांच्या खात्यावर शासनानं ठिबक सिंचनचं अनुदान म्हणून ५८ हजार जमा केले. अनेक दिवसांनंतर है पैसै मिळाल्यानं सोमनाथ आनंदी होते. परत ७ दिवसांच्या आत तेवढीच रक्कम बँक खात्यावर जमा झाली. खात्यावर पैसै आले म्हणून कुणीही सहज खर्च करून टाकले असते. या पैशांचा कुठलाही दुरूपयोग करू नये असा सोमनाथ यांनी निश्चय केला. त्यांनी सरकारी कार्यालयातून पैसै परत कसे द्यायचे याची माहिती घेतली आणि आता त्या जास्तीच्या पैशांचा डीडी करून ते पैसे आता सरकारला परत देतायत.
खरं तर सध्या सोमनाथ यांनाही पैशांची मोठी गरज आहे. त्यांच्या ४ एकर शेतातील कापूस मका, पूर्णपणे वाया गेलाय. मात्र तरीसुद्धा प्रामाणिकपणा काही कमी झाला नाही. अडचणी आहेत मात्र त्या सगळ्यांनाच आहेत असं ते सांगतात.