औरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी

सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.

Updated: May 16, 2018, 09:13 AM IST
औरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी title=

औरंगाबाद: किरकोळ वादाचे रुपांतर मोठ्या दंगलीत झाल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर औरंगाबादच्या दंगलीत सगळंच चित्र धूसर पाहायला मिळालं. पोलिसांवरही भरपूर टीका झाली. मात्र आपल्या कर्तव्याप्रती पोलीस किती प्रामाणिक आहे याचा एक उदाहरण समोर आलंय. सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.

पेपरवर लिहून विचारला प्रश्न

दरम्यान, कोळेकर यांना बोलता येत नव्हतं म्हणून त्यांनी एका पेपरवर लिहून पहिला हा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर आपल्या सहकाऱ्यांबाबतही त्यांना किती काळजी आहे हेही त्यांच्या दुसऱ्या प्रश्नातून समोर आलं. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची तब्येत कशी आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या सहकाऱ्या विषयीची काळजी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दंगल शांत झाली का हा प्रश्न कोळेकर यांना सतावत होता. यातूनच  कोळेकर यांची कामावरील निष्ठा, जबाबदारी दिसून येतेय. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी सगळेच प्रार्थना करतायत.

'औरंगाबादमधील दंगल राजकीय हेतूने घडवली'

दरम्यान, औरंगाबादच्या दंगलग्रस्त भागात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी मुंडेंनी स्थानिकांशी संवाद साधला. औरंगाबादमधील दंगल धार्मिक नव्हती तर राजकीय हेतूने घडवून आणलेली होती असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय. काही राजकीय नेत्यांनी आपले स्वार्थ साधण्यासाठी ही दंगल घडवून आणल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. औरंगाबादमधील घटनेमुळे पुन्हा एकदा सरकार आणि गृह विभागाचे अपयश असल्याचं मुंडे म्हणाले. विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असल्याचा इशाराही मुंडेंनी दिलाय. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या जातील असं विधान केलं होतं. औरंगाबादच्या दंगलीवरुन हे खरं वाटू लागल्याची प्रतिक्रियाही मुंडेंनी दिलीय.