जिल्हाध्यपद काँग्रेसकडे गेल्यानंतर शिवसेनेत बंड ?

 देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने शिवसेनेतील धुसपूस समोर

Updated: Jan 3, 2020, 02:17 PM IST
जिल्हाध्यपद काँग्रेसकडे गेल्यानंतर शिवसेनेत बंड ?  title=

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदाच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना आणि काँग्रेसचा फॉर्मुला ठरला आहे. इथे अध्यक्षपद निवडणूकीत अध्यक्ष पद काँग्रेसला तर उपाध्यक्ष पद शिवसेना असे गणित ठरले आहे. काँग्रेसतर्फे मीना शेळके तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या शुभांगी काजे यांनी अर्ज भरला आहे.

दरम्यान शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने शिवसेनेतील धुसपूस समोर आली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी काँग्रेसला संधी देण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पद शिवसेनेला देण्यात आले. ठरलेल्या या सूत्रानुसार काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी मीना शेळके तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शुभांगी काजे यांनी अर्ज दाखल केलेत.

शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दरम्यान अध्यक्ष पदावर एकाच व्यक्तीला बसता येत.त्यामुळे अपक्ष अर्ज मागे घेतील असं आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीच पुन्हा झेंडा फडकवेल असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान आमच्यात कोणतीही नाराजी नसून बंडखोरी होणार नसल्याचा दावा औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास बाबर नाराज 

विटा खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज असल्याची चर्चा असून ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. केंद्र आणि राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये फारकत आल्यानंतर सांगलीत बाबर यांनी भाजपला पाठींबा दिल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विटयात शनिवारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपाशी युती असल्याने आणि ते आमचे नैसर्गिक मित्र असल्याने आम्ही भाजपला पाठींबा दिल्याचे बाबर यांनी सांगितले.