औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने शाळेच्या मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मुख्याध्यापक जखमी झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेला शिपाई देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधल्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयामध्ये हल्ल्याची ही घटना घडली आहे. एक तरुण शाळेत येऊन वारंवार मुलींना त्रास देत होता. शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण यांच्या कानावर ही गोष्ट येतात त्यांनी या टवाळखोर मुलावर काही दिवस पाळत ठेवली.
यानंतर शाळेत मुलींची छेड का काढतोस असा जाब मुख्याध्यापकांनी त्या तरुणाला विचारला, तसंच त्याचे शाळेत आल्याचे काही फोटो मुख्याध्यापकांनी त्याच्या वडिलांनाही पाठवले.
या दोन्ही गोष्टींचा राग मनात धरून या तरुणाने आज शाळेत येत मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर अचानक त्याने तलावारीने आबासाहेब चव्हाण यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. या हल्ल्यात मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण जखमी झाले, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
शिक्षक संघटना आक्रमक
दरम्यान, शिक्षक हल्ल्या प्रकरणी कन्नडमधील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत कन्नडची एकही शाळा उघडणार नाही अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे. अटकेच्या मागणीसाठी शिक्षकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. आरोपीला अटक केलं नाही तर उद्या मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
तर आरोपीचा शोध सुरु असून आरोपीला २४ तासात अटक केलं जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.