औरंगाबाद : राज्यातील भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. एका शोरूम मालकाला मारहाण केल्या प्रकरणी एका खासदारावर गुन्हा दाखल होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
दिलीप गांधी असे या खासदाराचे नाव असून, ते अहमदनगरचे भाजप खासदार आहेत. एकटे दिलप गांधीच नव्हे तर, त्यांच्या इतर सहकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे आता खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एका शोरूम चालकाने केलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खा. गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करून खंडणी आणि अपहरणाची धमकी दिल्याचा शोरूम मालकाचा आरोप आहे. या आरोपाची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खासदार गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.