विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : चोरीच्या गाड्या पासिंग करुन देण्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयात उघड झालाय. काळजीची गोष्ट म्हणजे, आरटीओच्या अधिकाऱ्यांचाच याला वरदहस्त होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आणि त्यानंतर या दोन ट्रकच्या माध्यमातून चोरीचे ट्रक पासिंग करून घेणारे एक मोठं रँकेट उघडं झालंय.
हा सगळा प्रकार औरंगाबाद आरटीओ कार्यालयामध्ये सुरु होता. हे दोन्ही ट्रक मणिपूरमधून चोरीला गेले होते, ते औरंगाबादमध्ये आणण्यात आले. मणिपूर आरटीओ कार्यालयातून खोटं ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा आणण्यात आलं आणि त्यांचं महाराष्ट्रात पासिंगही झालं. धक्कादायक म्हणजे, आरटीओ कार्यालयातले सहाय्यक परिवहन आयुक्त श्रीकृष्ण नखाते यांच्या आशीर्वादानंच हे काम सुरू होतं.
श्रीकृष्ण नखाते हा अधिकारी सध्या फरार आहे त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढं येतील, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक मधुकर सावंत यांनी दिलीय.
आत्तापर्यंत चोरीच्या सहा ट्रकचं पासिंग झाल्याची माहिती आहे. मात्र, हे व्यवहार किती वर्षांपासून सुरु होते? किती गाड्यांची अशी पासिंग झाली? याचाही तपास होणार आहे.