विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ 64 टक्के इतके आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावल्यानं आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
काय आहे आदेश
औरंगाबादमध्ये लसीचा किमान एक डोस घेतल्या शिवाय आता दारू तर मिळणार नाहीच, मात्र बारमध्ये बसूनही दारू पिता येणार नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच गोची झालीये. यापूर्वी पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं करण्यात आलं होतं. तरीही टक्का वाढत नसल्यानं प्रशासनानं थेट दारू खरेदीसाठीही लसीची अट घातलीय. इतकंच नव्हे तर हॉटेलमध्येही लस घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा दिली जाणार आहे.
औरंगाबादमध्ये मद्यप्रेमींनी नवीन नियमाचा धसका घेतलाय. तर दारू दुकानदारांनी या नियमाला विरोध केलेला नाही. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलाय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मराठवाड्यात लसीकरणाचा टक्का घसरला
आतापर्यंत पहिला डोस 64.38 टक्के तर दुसरा डोस केवळ 27 टक्के नागरिकांनाच देण्यात आला आहे. खासकरून हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यात पहिल्या डोसचे प्रमाण सगळ्यात कमी आहे. तर दुस-या डोस मध्येही नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्याची कामगिरी सुमार आहे.
बीडमध्ये तर खुद्द जिल्हा शल्यचिकीत्सक रस्त्यावर उतरुन ऑन दी स्पॉट लस देत आहेत. बीड शहरात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना त्याठिकाणीच लस दिली जातेय. प्रशासनानं आता युद्धुपातळीवर सुरू केलेल्या या नव्या फंड्यांमुळे तरी मराठवाड्यातला लसीकरणाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.