Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याची संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त उत्सुक आहेत. देशातील इतर भागातही जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी महत्त्वाची मागणी केली आहे.
22 जानेवारी रोजी पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसंच मटण, चिकन, मासे यांची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे. 22 तारखेला देशभरात उत्साहाचं व आनंदी वातावरण राहावं यासाठी सर्व मद्यविक्री तसंच, मटण, चिकन, मासेविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
22 जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा होतं आहे, या निमित्ताने मीरा-भाईंदर शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामुळे हे कार्यक्रम सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेने एक दिवस शहरातील मास व दारूची दुकाने बंद ठेवावी, पालिका आयुक्तांनी तसे आदेश काढावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव विवेक चौबे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यातून 30 जानेवारीपासून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असतील. त्यासाठी प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुणे अयोध्या पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रेक वापरण्याची शक्यता आहे. अयोध्येहून पुण्यासाठी 15 विशेष गाड्याही सोडण्यात येणार आहेत. एका गाडीमधून साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत.