Akshay Shinde Death: अक्षय शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल! एफआयआरमध्ये नेमके काय आरोप?

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 24, 2024, 01:44 PM IST
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल! एफआयआरमध्ये नेमके काय आरोप? title=
Badlapur News case has been registered on accused Akshay Shinde over firing at police

Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलिस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला तर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. आता मृत अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. अक्षयच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी तळोजा कारागृहात पोहोचले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंब्रा बायपास मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. तर पोलिस निरीक्षक मोरे हे जखमी झाले आहे. 

अक्षय शिंदे यांने पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसांवर हल्ला या दोन मोठ्या कारणांमुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयने पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारात एक गोळी सहाय्यक पोलिस निरीक्षण नीलेश मोरे यांच्या मांडीला लागली असल्याचे समजतंच. तसंच, पोलिस अधिकाऱ्यांने गोळ्या झाडल्यानंतर अक्षयच्या मानेखाली गोळी लागली होती. जखमी अवस्थेत त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दरम्यान, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. आरोपीचे हात बांधले असताना त्याने गोळीबार कसा केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसंच, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली आहे.