अमर काणे, अमोल पेडणेकर (मुंबई\ नागपूर) : छगन भुजबळांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिंडळातून राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यासाठी धनंजय मुंडेंची बीड प्रकरणात विकेट काढली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या दाव्याने सध्या राजकारणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडवून दिलीये.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये, असं असतानाच आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचं अजित पवारांच्या मनात आहे असा दावा काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी केलाय. यासाठी धनंजय मुंडेंची विकेट काढून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात इन करण्याचा डाव आहे का असा संशय विरोधकांकडून व्यक्त होतोय. धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याचा अर्थ काय असा सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.
सत्तेचा गैरवापर करून लोकांचे जीव घेतला जात असेल तर अशा मंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. तर वडेट्टीवारांच्या आरोपांवर भुजबळांनी सावध प्रतिक्रिया दिलीये. मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले होते. त्याच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये स्वतःच्याच पक्षविरोधात आंदोलन करताना पाहायला मिळाले होते. तर छगन भुजबळ देखील पक्षा विरोधात बंद करण्याच्या पवित्र्यात होते.
राजकारणात कोणी तरी आऊट झाला तर कोणतरी इन होत असतो असं म्हणतात. पण भुजबळांना इन करण्यासाठी मुंडेंना आऊट करण्याची कुणाची रणनिती असेल तर मुंडेंच्या भविष्यातल्या राजकारणासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.