Maha Vikas Aghadi Silent Protest Sharad Pawar Oath: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर मविआने बंद मागे घेतला. मात्र आज राज्यभरामध्ये ठिकाणठिकाणी काळ्या फिती बांधून मूक आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून आंदोलनं केली जात आहेत. पुण्यामधील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारही सहभागी झाले होते. यावेळेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबरोबर महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. शरद पवारांनी तोंडावर काळं मास्क लावून निषेध नोंदवला.
"बदलापूरमध्ये जे घटना घडली त्याची देशभरमध्ये पडसाद पाहायला मिळत आहे. बदलापूर सारख्या घटना आणखी काही ठिकाणी घडलेल्या आहेत. राज्यात भगिनींवर होत असल्याच्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्या सातत्याने ऐकायला मिळत आहेत. जी घटना घडलीय त्याची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे," असं शरद पवार म्हणाले. "बदलापूरच्या घटनेचं विरोधक राजकारण करत आहेत, असं राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी म्हणतात त्याचं वाईट वाटतं," असंही शरद पवार म्हणाले. "जे बदलापूरमध्ये घडले ते महाराष्ट्रात घडून ये अशी आमची इच्छा आहे," असंही शरद पवार म्हणाले.
यावेळेस शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक शपथही दिली. मुलींवरील अत्याचारांविरोधात ही शपथ होती. या शपथेमध्ये नेमकं काय होतं ते पाहूयात...
मी अशी शपथ देतो की, मी हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही.
माझे घर, माझे मुलगा, माझे घर, माझे ऑफिस जर कोणत्याही महिला, मुलीवर अत्याचार होत असेल तर त्याचा मी विरोध करून त्याविरुद्ध आवाज उठवेन.
मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही.
महिलांचा सन्मान राखेन आणि पुण्यनगरी मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त जिथे बनवण्यासाठी प्रयत्न करेन.
मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी सकाळी साडे अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी तोंडावर काळं मास्क लावून हजेरी लावली. त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याबरोबर पक्षाचे आमदार सचिन अहिर,आमदार संजय पोतनीस, दिवाकर रावते तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून स्टेजवर उपस्थित होते.