Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पोलीस दलाचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार घरगडी असल्याप्रमाणे वापरत असल्याचा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा संदर्भ देत कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या पक्षाने ही टीका केली आहे. एवढच नाही तर पोलिसांच्या हातातील दंडुक्याची थेट राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या हातातील काठीशी तुलना करत ठाकरेंच्या पक्षाने टीका केली आहे.
"राज्यात पोलिसांना मिंधे सरकार व भाजपचे घरगडी असल्यासारखे वापरले जात आहे. पैशांचा चोख व्यवहार ठोक भावात झाल्याशिवाय पोलिसांच्या बदल्या, बढत्या होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण पोलीस खाते हे ‘टोळी’ असल्याप्रमाणे चालवले जात आहे," अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. "मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते. त्यामुळे लाडक्या बहिणीचे रक्षण करायचे की ‘दाम करी काम’साठी वर्गणी गोळा करायची? ठाणे जिल्ह्यातील पोलीस खात्यात तर एक प्रकारे अनागोंदी व अराजकाची स्थिती निर्माण झाली. मिंध्यांनी पोलीस स्टेशनात अगदी आयुक्तांपासून सर्वत्र निर्लज्ज व निर्जीव माणसे नेमून ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली हा भाग आपल्या गुंडांसाठी मोकाट सोडला आहे," असा आरोप ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.
"अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून यांना पोलीस म्हणायचे, पण ते खरेच राज्याचे पोलीस व कायद्याचे रखवालदार असते तर त्या बदलापूरच्या माऊलीस मुलीवरील अत्याचाराची तक्रार करण्यासाठी दहा तास वणवण करावी लागली नसती. बलात्काराची तक्रार दाखल होऊ नये यासाठी ‘मिंधे’छाप पोलिसांवर दबाव होता हे आता पक्के झाले, पण हा दबाव नक्की कुणाचा होता याचा खुलासा होत नाही," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'ही कसली लोकशाही?' बंद रद्द झाल्याने ठाकरेंची सेना संतापून म्हणाली, 'जरांगेंनी फडणवीसांवर...'
"ठाणे शहरातील पोलीस आयुक्त व त्यांची खाकी वर्दीतील टोळी ही मिंधे टोळीची भागीदार असल्याप्रमाणे काम करत आहे. हेच चित्र राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यांत आहे. पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघ परिवारातील दंडुक्याप्रमाणे तो निर्जीव आणि निक्रिय बनवल्याने राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वापर, हत्या, बलात्कार, अपहरण, धमक्यांचे प्रमाण वाढले आहे व या गुन्हेगारीची सूत्रे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून चालवली जात असतील तर महाराष्ट्राची अवस्था आज आहे त्यापेक्षा बिकट झाल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा ठाकरेंच्या पक्षाने दिला आहे.
तसेच, "राज्य चुकीच्या माणसांच्या हाती गेले की, कायदा हा गुन्हेगारांच्या हातातले बाहुले बनतो व चिमुकल्या बाहुल्यांवरचा अत्याचार उघड्या डोळ्यांनी सहन करतो," असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.