56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा

मुरबाड (Murbad) तालुक्यातील बांगर पाडा (Bangar Pada) गावात असलेल्या बांगरवाड्याला (Bangarwada) मात्र  56 दरवाजे आणि 85 खिडक्या आहेत.  

Updated: Feb 21, 2021, 05:25 PM IST
56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा

चंद्रशेखर भुयार / मुरबाड : आठशे खिडक्या आणि नऊशे दार या मराठी लोकगितातील ओळी आपल्याला अतिशयोक्ती वाटत असल्या तरी  मुरबाड (Murbad) तालुक्यातील बांगर पाडा (Bangar Pada) गावात असलेल्या बांगरवाड्याला (Bangarwada) मात्र  56 दरवाजे आणि 85 खिडक्या आहेत. तब्बल 300 वर्षे जुना हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. अपार्टमेंट आणि टॉवरच्या युगात ऐसपैस वाडा संस्कृती आता नामशेष होत चालली आहे. असं असली तरी ठाणे जिल्हयातील मुरबाडमध्ये (Murbad) तब्बल दीड एकरात अडीच मजल्यांचा भव्य वाडा अजूनही सुस्थितीत उभा आहे .

मुरबाडच्या नारीवली ग्रामपंचायत हद्दीतील बांगरपाड्यातील हा वाडा तीन शतकांहून अधिक काळातील उन्हाळे पावसाळे झेलत अजूनही उभा आहे , या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाड्याला  56  दरवाजे आणि 85 खिडक्या आहेत . हा वाडा दुष्काळाच्या काळात म्हसा परिसरातील 24 गावांचा पोशिंदा होता. कान्हू गोविंद बांगर यांनी हा वाडा बांधला. 1870 पासून या वाडयाविषयीच्या कागदोपत्री नोंदी उपलब्ध आहेत. 

या पश्चिमाभिमुख वाड्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्वेकडील सूर्यप्रकाश दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून थेट दिवाणखान्यापर्यंत येण्याची सोय आहे. त्यामुळे संपूर्ण वाड्यात नैसर्गिकरित्या पुरेशा सूर्यप्रकाश असतो. हवा खेळती राहण्यासाठी तब्बल 85 खिडक्या आहेत. वाड्यावर तब्बल पंधरा हजार कौले आहेत. दगड, चुना आणि सागवानी लाकडापासून साकारलेला हा वाडा अजूनही भक्कम अवस्थेत ताठमानेने उभा आहे.  वाड्याचे दरवाजे  उंबऱ्याच्या लाकडापासून तयार केलेत. त्यांच्यावर असलेल्या नक्षिकाम  म्हणजे वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.वाड्यातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था आहे. ती इतक्या काळानंतरही व्यवस्थित कार्यान्वीत आहे.

सध्या बांगर कुटुंबातील 20 जण वाड्यात राहतात. सणासुदीला 50माणसांचा गोतावळा एकत्र येतो आणि हा वाडा भरल्यासारखा वाटतो. सिद्धगडच्या पायथ्याशी असलेल्या या वाड्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याची गरज आहे . कवितेत वर्णन केलेला ‘मामाचा वाडा चिरेबंदी' नेमका कसा असतो हे या वाड्याच्या रूपाने  समजू शकेल.