VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 13, 2024, 02:01 PM IST
VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर title=

Baramati Loksabha : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी दीर भावजय अशी लढत होणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना जिंकण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील गावोगावी भेटी देत ​​आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीनेदेखील कंबर कसली आहे. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी बारामतीच्या जनतेने शरद पवार यांच्या कन्येला तीनदा निवडणूक जिंकून संसदेत पाठवले, आता त्यांनी शरद पवारांच्या सुनेला विजयी करावे, असे म्हटलं. यासोबत पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहनही अजित पवारांनी बारामतीत केलं. 

त्यावर शरद पवारांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आता शरद पवारांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख सुनेत्रा पवारांकडे होता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.. याबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र या वक्तव्यामुळे त्यांना भावना अनावर झाल्या.

माध्यमांनी शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ या वक्तव्याबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार भावूक झाल्या. याबाबत आपलं काय म्हणणं आहे असं विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ मान हलवत डोळ्याला रुमाल लावून आपले अश्रू पुसले. 

दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. पोटच्या पोरीसाठी शरद पवार धृतराष्ट्र झालेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी दिली आहे. तर सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले. बारामतीच्या काकांचं हे वाक्य, महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करुन सासरी गेलेल्या सुनांचा अपमान आहे. सो कॉल्ड फुरोगामी, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे.