जावेद मुलाणी, झी मिडिया, बारामती : बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनाचा आज तीसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. यात पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे. टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे..
बारामतीतील माळेगावच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीच्या मळ्यावर सध्या कृषिक प्रदर्शन सुरू असून राज्यभरातील शेतकरी येथे भेट देत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके या ठिकाणी आहेतच, परंतु शेतीच्या वाणांमध्ये आधुनिक बदल करण्याचे प्रयोग देखील या ठिकाणी करण्यात आले आहेत.
यातीलच एक प्रयोग शेतकऱ्यांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेत आहे, तो आहे पोमॅटो! म्हणजे पोटॅटो आणि टोमॅटो यांचा संकर. एकाच पिकामध्ये एकाच पाण्यामध्ये दोन पिके घेण्याचा हा अफलातून प्रयोग आहे. यामध्ये बटाट्याचे खोड आणि त्याला टोमॅटोचा कृत्रिम कलम लावण्यात आलं आहे. यामध्ये जमिनीच्या वरच्या बाजूला टोमॅटो लागतात, तर जमिनीच्या खालच्या बाजूला बटाटे लागतात. यात पोटॅटो आणि टोमॅटो एकत्रित आहेत म्हणून त्याला पोमॅटो असे नाव दिले जाते.
दुसरा प्रयोग आहे ब्रिमँटोचा. म्हणजेच एकाच गावठी खोडाला वांगे एका फांदीवरती आणि दुसऱ्या फांदीवरती टोमॅटो लागलेले असतात. वांग्याला इंग्लिश मध्ये ब्रिंजल असे म्हणतात. म्हणूनच एकाच खोडावरती एक फांदी वांग्याची आणि दुसरी फांदी टोमॅटोची म्हणून याला ब्रिमँटो असं नाव दिलं आहे. बारामतीतील या प्रयोगामध्ये एका बाजूला वांगी लागलेली आहेत, तर एका बाजूला टोमॅटो लागलेले आहेत.
निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये असे म्हटलं जात. मात्र निसर्ग देखील अशा वेगळ्या प्रयोगाला हरकती घेत नाही. कारण ठराविक पाण्याच्या अंशातून आणि त्याच खताच्या मात्रेतून जर एकाच वेळी एकाच जागेवरती दोन पिकांची उत्पादने मिळत असतील, तर ती देखील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत. भविष्यात कमी जागेमध्ये अधिक उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांना यशस्वी करावाच लागणार आहे. त्या दृष्टीने असे काही तऱ्हेवाईक असले, तरी वेगवेगळ्या प्रकारचे नवनवे प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत आणि म्हणूनच राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये या प्रयोगाची चर्चा आहे.