कधी पाहिलीय का, झीरो फिगर कुत्री ! लठ्ठपणा कमी करण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया

आतापर्यंत तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी माणसांवर शस्त्रक्रिया झाल्याचे ऐकले असेल. पण पुण्यात चक्क एका कुत्रीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली. (Bariatric Surgery on Animal) 

Updated: Jun 17, 2021, 06:18 PM IST
कधी पाहिलीय का, झीरो फिगर कुत्री ! लठ्ठपणा कमी करण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया

पुणे : आतापर्यंत तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी माणसांवर शस्त्रक्रिया झाल्याचे ऐकले असेल. पण पुण्यात चक्क एका कुत्रीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली. (Bariatric Surgery on Animal) वजन कमी करण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, एका श्वानाने (कुत्रीने) आपले वजन कमी करण्यासाठी ‘लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टॉमी’ शस्त्रक्रिया करून घेतली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच घटना आहे. हे ऐकल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. (In a first-of-its-kind, laparoscopic sleeve gastrectomy surgery was performed on a dog )

लठ्ठपणा हा आजार असून माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्येही लठ्ठपणा वाढतोय. पुण्यात अशाच एका 50 किलो वजन असलेल्या एका कुत्र्यांवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभरात श्वानाच्या वजनात तब्बल पाच किलोने घट झाली आहे. त्यामुळे आता श्वानाचे वजन 45 किलो इतके झाले आहे.

शस्त्रक्रिया करण्यात आलेली ती आता इतर कुत्र्यांप्रमाणे बागडताना दिसत आहे. हे शक्य झालेय तिच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे. अतिवजनामुळे दीपिकाला वेगवेगळे आजार जडले होते. दारूवाला कुटुंबीयांनी तिला प्राण्यांचे डॉक्टर नरेंद्र परदेशी यांच्याकडे नेले. तेव्हा त्यांनी दीपिकाचे वजन घटवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी माणसांप्रमाणे दीपिकावरही लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅ-क्टॉमी ही शस्त्रक्रिया करायचे ठरवले. खरं तर एका प्राण्यावर अशी शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी खूप आव्हानात्मक होते. पण डॉक्टरांनी हे आव्हान लिलया पेललं.

शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभरात दीपिकाचं वजन 50 किलोंवरून 45 किलो झालं. या शस्त्रक्रियेसाठी दारूवाला कुटुंबीयांना तब्बल 1 लाख 40 हजार रूपयांचा खर्च आला आहे. त्यासाठी त्यांनी कर्जही घेतले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका पुन्हा चालू लागली आहे. त्यामुळे दारूवाला कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या निमित्ताने पुण्यातली झीरो फिगर दीपिका जगात भारी ठरलीय, असं म्हणायला हरकत नाही. 

पुण्यातील लँपरो ओबेसो सेंटरचे लेप्रोस्क्रोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शाह म्हणाले की, माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही लठ्ठपणा हा आजार वाढतोय. व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळा अनिश्चित असल्याने प्राण्यांमध्ये वजन वाढू लागले आहे. देशात अनेक लठ्ठ पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. 

स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे (एम व्ही एससी-सर्जरी व्हेट लेप्रोस्कोपिक सर्जन) डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की, ‘लठ्ठपणामुळे श्वानांचे सांधे कमकुवत होत असल्याने शारीरिक हालचाल मंदावते. या श्वानाच्या शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी अनेक वैदयकीय चाचण्या करण्यात आल्या. शरीरातील चरबीनुसार श्वानाच्या आहारात बदलत करण्यात आला. याशिवाय औषधोपचाराद्वारे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण त्याचा श्वानावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर श्वानाच्या मालकाशी चर्चा करून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

तसेच डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की, पाळीव प्राण्यांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. पाळीव प्राण्याचे वजन वाढत असल्यास तातडीने पशूवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दरम्यान, श्वानावर लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी करत त्याची नोंद होईल असं सर्वप्रथम पुण्यातच घडले आहे. त्यामुळे पुणे तिथं काय उणे असं म्हटले जात ते अश्या वेगवेगळ्या गोष्टींमुळेच.