विकृतीचा कळस! मुलाकडून काठीनं बेदम मारहाण, आईनं सोडला प्राण; वडील गंभीर जखमी

फादर्स डेच्या दिवशीच महाराष्ट्रातील संतापजनक घटना, जन्मदात्या आई-वडिलांना मुलानं दगड-काठीनं केली बेदम मारहाण

Updated: Jun 20, 2021, 11:47 AM IST
विकृतीचा कळस! मुलाकडून काठीनं बेदम मारहाण, आईनं सोडला प्राण; वडील गंभीर जखमी

विष्णू बुर्गे झी मीडिया बीड: जन्मदात्या आई-वडिलांनाच मुलानं अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या वृद्ध दाम्पत्याला वाचवण्या ऐवजी लोकांनी बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ काढले आहेत. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गावात घडला आहे. 

विकृत मुलाकडून आई वडिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. काठी आणि दगडाने मारहाण होत असताना वृद्ध मदतीची याचना करत होते. त्यावेळी त्यांना वाचविण्याऐवजी गावातील लोक मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. 

या अमानुष मारहाणीत अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर वडील गंभीर आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटना शिरूर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे काल सायंकाळी घडली. 

त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रोगी असल्याचे समजते. काल सायंकाळी या मुलाने आई-वडिलांना अमानुष मारहाण केली.  रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आलं होते. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत. 

याप्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही. मारहाण होत असताना वृद्ध मदतीची याचना करीत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र लोकांनी मध्यस्ती करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली.