धक्कादायक! पत्नीचं मोबाईलवेड उठलं पतीच्या जीवावर

नात्यांमध्ये दुरावा आणणाऱ्या मोबाईलनं एकमेकांच्या जीवावरही उठू लागला... पतीसोबत पत्नीनं काय केलं पाहा व्हिडीओ

Updated: Oct 16, 2021, 09:26 PM IST
धक्कादायक! पत्नीचं मोबाईलवेड उठलं पतीच्या जीवावर

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: मोबाईल हा आजकाल जीव की प्राण झाला आहे. नात्यापेक्षा जास्त मोबाईल प्रिय अशी गत झाली आहे. मोबाईलच वेड काय काय करायला लावू शकतं याची कल्पना न केलेलीच बरी. एका मोबाईलवेड्या पत्नीनं तर चक्क आपल्या पतीवर हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. 

पती-पत्नीमधला वाद तसा आपल्यासाठी नवीन नाही. मात्र एखाद्या गोष्टीवरून हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो याचा प्रत्यय भंडा-यातील एका पतीला आला आहे. मोबाईल दिला नाही म्हणून संतापलेल्या पत्नीनं पतीचे ओठच कापले. 

मोबाईलमुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. मात्र भंडा-यातल्या एका पतीला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. मोबाईलवेड्या पत्नीच्या हातून मोबाईल घेतला म्हणून पत्नीनं चक्क पतीचे ओठच कापले आहेत. लाखांदूर तालुक्यातील मासळ इथे ही धक्कादायक घटना घडली. 

खेमराज मूल यांचा मोबाईल बिघडल्यानं त्यांनी पत्नीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. 2 दिवस उलटूनही पती मोबाईल देत नसल्यानं नवरा-बायकोत कडाक्याचं भांडण झालं. याच रागातून पत्नीनं विळ्यानं पतीच्या तोंडावर वार केला. त्यात खेमराज यांचे ओठ कापले गेले. त्यांच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यात मात्र दुरावा वाढला आहे. फेसबुकवर हजारो मित्र,  मात्र कुटुंबातल्या सदस्यांशी बोलायला वेळ नाही हीच गत प्रत्येकाची झाली. सोशल मीडियातला अतिरिक्त वावर माणसा-माणसात दरी निर्माण करतो आहे. 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याआधी देखील मोबाईलमुळे नात्यांमध्ये दुरावा आल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र आतातर हा मोबाईल एकमेकांच्या जीवावरही उठू लागला आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर किती आणि कसा करायचा, याचं भान बाळगायला हवं. अन्यथा घराघरात संघर्ष अटळ आहे.