संघाच्या सरकार्यवाहपदी भैयाजी जोशींची फेरनिवड

प्रतिनिधी सभेच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 09:57 PM IST
संघाच्या सरकार्यवाहपदी भैयाजी जोशींची फेरनिवड title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली आहे. नागपुरातल्या रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भैय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी फेरनिवड एकमताने निवड करण्यात आली. भैय्याजी जोशी यांच्यावर सलग चौथ्यांदा या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

सरकार्यवाहपदाची निवडणूक दर तीन वर्षांनी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक दर तीन वर्षांनी होते. सरकार्यवाहपदी यंदा भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना संधी मिळते, याबाबत संघ वर्तुळात उत्सुकता होती. त्यानुसार शनिवारी निवडप्रक्रिया राबवण्यात आली आणि भैय्याजी जोशी यांचीच फेरनिवड झाली. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी भैय्याजी जोशी यांची निवड झाल्याची घोषणा केली.

सरकार्यवाह निवडणुकीचा घटनाक्रम 

निवडणुकीसाठी मध्य क्षेत्र संघचालक अशोक सोहनी निवडणूक अधिकारी 
पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेरियांद्वारे भैय्याजी जोशींच्या नावाचा प्रस्ताव 
जयंतीभाई भाडेरियांकडून भैय्याजींच्या कार्यकाळातील संघ प्रगतीचा उल्लेख 
पूर्व उत्तर प्रदेश संघचालक वीरेंद्र पराक्रमादित्य, दक्षिण प्रांत कार्यवाह राजेंद्रन, कोकण प्रांत सहकार्यवाह 
विठ्ठल कांबळे, आसाम क्षेत्र कार्यवाह डॉ. उमेश चक्रवर्ती यांचं जोशींच्या नावाला अनुमोदन 

न भूतो न भविष्यति यश

सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचं नाव चर्चेत असतानाही, संघश्रेष्ठींचा कल भैय्याजी जोशी यांच्याकडेच होता. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या  प्रचारात सक्रिय भूमिका पार पाडली होती. यात भैय्याजी जोशी यांनी संपूर्ण रणनिती आणि समन्वय ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपाला ‘न भुतो न भविष्यति’ असे यश मिळवायला मदत झाली होती. 

भैय्याजी जोशी यांच्या कार्यकाळात संघाचा विस्तार

शिवाय भैय्याजी जोशी यांच्या कार्यकाळात संघाचा विस्तारही. उत्तरप्रदेशसह ईशान्येत त्यांच्या कार्यकाळात संघकार्यात वाढ झाली. २०१२ साली जोशी यांनी दुस-यांदा सरकार्यवाहपदाची सूत्रे घेतल्यापासून  सहा वर्षात संघाच्या शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे भैय्याजी जोशी यांच्या अनुभवावरच संघाच्या प्रतिनिधींनी विश्वास टाकत, पुन्हा एकदा त्यांच्याकडेच संघ परिवारातलं क्रमांक दोनचं सरकार्यवाहपदाची जबाबदारी सोपवली.