दर महिन्याला होणार तुमची RT-PCR टेस्ट? लस घ्या, अन्यथा कडक कारवाई?

लसीचा दुसरा डोस घेतला नाही, मग तुमच्यावर होणार ही कठोर कारवाई 

Updated: Dec 10, 2021, 08:47 PM IST
दर महिन्याला होणार तुमची RT-PCR टेस्ट? लस घ्या, अन्यथा कडक कारवाई? title=

विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : तुम्ही जर लसीचा दुसरा डोस वेळेत घेतला नाहीत तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. ओमायक्रॉनचा धोका आणि तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिलेत. 

दुसरीकडे औरंगाबादच्या जिल्हाधिका-यांनीही लसीकरणासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. वेळ देऊनही अनेकांनी लस घेतली नाही. त्यामुळे आता कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र अजूनही अनेकजण लस घेण्यासाठी चालढकल करत आहेत. अशा लोकांची आता खैर नाही. लसीकरणासाठी राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलं आहे. 

लस घेतली नाही तर पुन्हा कडक निर्बंध लागू होतील असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यात पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाल्यानंतरही दुसरा डोस न घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे दीड ते पावणे दोन कोटी आहे. 

महाराष्ट्रात 10 जिल्हे असे आहेत जिथं लसीचा एकही डोस न घेणा-या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यात 14 लाख 88 हजार लोकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

नाशिकमध्ये ही संख्या 12 लाख 24 हजार इतकी आहे. त्याखालोखाल जळगावात 9 लाख 46 हजार, नगरमध्ये 9 लाख 7 हजार आणि नांदेडमध्ये 9 लाख 3 हजार लोकांनी अद्याप लस घेतलेली नाही. 

सोलापुरात 9 लाख 90 हजार, औरंगाबादमध्ये 6 लाख 68 हजार तर बीडमध्येही 6 लाख 68 हजार लोकांनी लस घेतलेली नाही. लसीकरणासाठी लोक टाळाटाळ करत असल्यानं औरंगाबादच्या जिल्हाधिका-यांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला. 

लस न घेणा-यांची दर महिन्याला सक्तीनं RT-PCR टेस्ट केली जाईल. सुरूवातीला कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर ही कारवाई होईल. RT-PCR सक्तीचा हेतू चांगला आहे, मात्र आपण त्याचं समर्थन करणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.

दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता कडक निर्बंध कुणालाही परवडण्याजोगे नाहीत. त्यामुळे लस न घेतलेल्यांनो आतातरी सुधरा आणि तातडीनं लस टोचून घ्या.