पुण्यात शिवभोजनासाठी मोठी गर्दी, नियंत्रणासाठी पोलिसांचं पाचारण

पुण्यातल्या मार्केट यार्डात शिवभोजनासाठी मोठी रांग

Updated: Jan 29, 2020, 12:39 PM IST
पुण्यात शिवभोजनासाठी मोठी गर्दी, नियंत्रणासाठी पोलिसांचं पाचारण

पुणे : पुण्यातल्या मार्केट यार्डात शिवभोजनासाठी मोठी रांग लागली आहे. ही गर्दी इतकी वाढली आहे की, लोकांना नियंत्रणासाठी पोलिसांना बोलवण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने १० रुपयात शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने १० रुपयांत भोजनाची थाळी देण्याचं वचन दिलं होते. 'शिवभोजन' योजनेचा मंत्रिमंडळात आढावा घेतल्यानंतर २६ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले होते.

सरकार आल्यानंतर त्यांनी सामाईक कार्यक्रमात 'शिवभोजन' योजनेचा समावेश केला होता. त्याला प्राधान्य दिले होते. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी या योजनेवर निर्णय घेतला. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'शिवभोजन' योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाने या शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती.

'शिवभोजन' योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राज्यात ५० ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिसाद आणि काही अडचणी आल्या तर त्या दूर करुन ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळत ही थाळी उपलब्ध होणार असून शिवभोजन योजनेंतर्गत जेवणात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असून ही थाळी १० रुपयांत देण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेत तीन महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.