राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, एवढ्या कोंबड्या कशा मारल्या जाणार?

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आजही विविध ठिकाणी पक्ष्यांचे बळी जात आहेत. परभणीत (Parbhani) हजारो कोंबड्यांना (Hens) जिवंत पुरुन मारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  

Updated: Jan 12, 2021, 08:09 PM IST
राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, एवढ्या कोंबड्या कशा मारल्या जाणार?     title=

गजानन देशमुख / मुंबई / परभणी : राज्यात (Maharashtra) आजही विविध ठिकाणी पक्ष्यांचे बळी जात आहेत. परभणीत (Parbhani) हजारो कोंबड्यांना (Hens) जिवंत पुरुन मारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी राज्यातला बर्डफ्लू (Bird flu) रोखायचा कसा, हे मोठं आव्हान आहे. त्यासाठीच हजारो कोंबड्यांना जिवंत पुरुन मारण्याची प्रक्रिया सुरू झाली. अशा कोंबड्या का माराव्या लागत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या कशा मारल्या जाणार हाच मोठा प्रश्न आहे. 

परभणीमधलं मुरुंबा गाव. जिथे राज्यात सगळ्यात पहिल्यांदा बर्ड फ्लूचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला. गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. हजारो कोंबड्या मारण्याची प्रक्रिया इथे सुरू झाली आहे. चार पोल्ट्री फार्मवरच्या जिवंत कोंबड्यांना खड्ड्यात पुरुन मारलं जात आहे. बर्ड फ्लू आटोक्यात आणायचा असेल कोंबड्यांना मारणं हा एकमेव उपाय आहे.

शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून त्यांची विल्हेवाट लावली जाते कारण बर्ड फ्लू एकदा झाला की लगेचच पक्ष्यांचा मृत्यू होतो. ज्या फार्मवर बर्ड फ्लूचा अटॅक झालाय, तिथले सगळेच पक्षी मरण्याची शक्यता असते. ज्या पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लू झाला असेल या कोंबड्यांना वेळीच मारलं नाही, तर हा बर्ड फ्लू वेगानं पसरू शकतो. जेसीबीच्या मदतीनं मोठा खड्डा खणून त्यामध्ये जिवंत कोंबड्या पुरल्या जातात आणि त्यांना मारलं जाते.

जमिनीद्वारे बर्डफ्लूचं संक्रमण होऊ नये म्हणून पक्ष्यांना पुरताना मोठ्या प्रमाणात चुनखडीचा वापर केला जातो. पुरलेल्या पक्ष्यांचे अवशेष इतर प्राणी बाहेर काढणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. सध्या परभणीमधली मुरुंबा आणि कुपटा गावं प्रतिबंधित क्षेत्रं म्हणून निश्चित करण्यात आलीयत. गावचा 5 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आलाय. या परिसरात कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलीय. बर्ड फ्लूला रोखणं हे मोठं आव्हान आहे. 

व्यावसायिकांचं मोठं नुकसान 

बर्ड फ्लूमुळं छोट्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाले आहे. पक्ष्यांना बर्ड फ्लू झाला नसतानाही शेकडो कोंबड्या मारल्या जातायतय. यामुळं व्यावसायिक देशोधडीला लागलेत. परभणी जिल्ह्यातल्या मुरंबा गावातील या आहेत संगीता चोपडे. संगीताताई हवालदिल झाल्यात. बर्ड फ्लू नसतानाही त्यांच्या शेडमध्ये असलेल्या सर्व कोंबड्या मारण्यात येणार आहेत. संगीता यांनी अडीच लाखांचं कर्ज काढून कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला. पण बर्ड फ्लूनं त्यांना मोठा फटका बसला आहे. बर्ड फ्लू पेक्षाही व्यावसायिकांना अफवांची भीती वाटते. या अफवांमुळंच त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे.