अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आज युतीवर अंतिम शिक्कामोर्तब ?

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या शिवसेना भाजपमधील युतीच्या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 18, 2019, 07:55 AM IST
अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आज युतीवर अंतिम शिक्कामोर्तब ? title=

मुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या शिवसेना भाजपमधील युतीच्या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना - भाजप हे आज एका संयुक्त पत्रकार परिषदद्वारे युतीबाबत घोषणा करणार असल्याचं समजतंय. यामध्ये लोकसभा निवडणुकीचे जागावाटप आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हे घोषित केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. याआधी अमित शाह मुंबईत येत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत युतीबाबत अंतिम बोलणी करत युतीवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची चर्चा आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत 25-23 चे सुत्र घेऊन भाजपा शिवसेना निवडणूकीत उतरणार आहे. म्हणजेच भाजपा 25 जागांवर तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवेल. 

तर विधानसभेसाठी 144-144 जागांचे सुत्र तयार करण्यात आले आहे. गेले अनेक दिवस युतीचे घोंगडे भिजत ठेवण्यात येत होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपाच्या धोरणांवर सातत्याने टीका करण्यात येत होती. त्याआधीच समान वागणूक मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार करत होते. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल वाढ, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजपाला धारेवर धरले होते. त्यामुळे याच भाजपा सोबत शिवसेना पुन्हा सत्तेत बसण्यास तयार होईल का ? यावर सामान्य नागरिकांना प्रश्न पडला होता. आता युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून येत आहे.

'मी सांगतो ते खरं असतं'

मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं. त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युतीसंदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.