मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी पोलिसांनी अखेर अटक केली. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही अलिकडच्या काळातील दुर्मीळ घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात वाजवण्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य राणेंनी सोमवारी रायगडमध्ये केलं होतं.
दरम्यान, भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते विनोद तावडे राजभवनवर दाखल झाले असून नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भात राज्यपालांशी चर्चा करणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!! असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.
राज्य सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असून याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारला आणि विशेषतः शिवसेनेला यातून आम्ही गर्भित इशारा देऊ इच्छितो. सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू असा गर्भित इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.