प्रवीण दरेकर यांचं 'ते' वक्तव्य म्हणजे वाक्यप्रचार, चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण

'रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष' अशी टीका प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती

Updated: Sep 14, 2021, 03:08 PM IST
प्रवीण दरेकर यांचं 'ते' वक्तव्य म्हणजे वाक्यप्रचार, चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण title=

पुणे : भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना स्पष्ट इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे ट्विट चाकणकर यांनी केलं आहे. 

चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण

यानंतर आता भाजपकडून सारवासारव केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रवीण दरकेर यांची पाठराखण करत दरेकर यांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नव्हता असं म्हटलं आहे. प्रविण दरेकर जे वाक्य बोलले ते बोलीभाषेत वापरलं जातं. त्याचा एवढा इश्यू करण्याची गरज नाहीय. आपण दररोजच्या बोलण्यात वाक्यप्रचार वापरत असतो. राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठाकरे सरकारला गरिबांच्या कल्याणाचं काही पडलेलं नाही. श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्यांची तुम्हाला अधिक काळजी आहे, असं सांगण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी ते विधान केलं आहे. त्यावरून एवढा गदारोळ करण्याचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन त्यांचं नाव न घेता प्रविण दरेकर यांनी हे वक्तव्य केलं होतं.