'पक्षप्रमुख नव्हे तर बिघडलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलला'

आमदार नितेश राणेंची टीका 

Updated: Oct 26, 2020, 03:35 PM IST
'पक्षप्रमुख नव्हे तर बिघडलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलला'

मुंबई : काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख नव्हे तर बिघडलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलला अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कालच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे आणि परीवारावर टीका केली होती. याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. स्वत:च्या मुलावर संस्कार केले असते तर दुसऱ्याच्या मुलांवर बोलायची वेळ आली नसती, ड्रग प्रकरणाच्या यादीत त्याचे नाव आले नसते असेही राणे म्हणाले. 

बाळासाहेबांच्या अंगणात तुळशीचेच झाड होते पण आता त्यांचा श्रावणबाळ जिथं दिनोच्या घरी जातो, तिथं गांजाची झाडे आहेत की कसली आहेत ते बघा असे नितेश राणे म्हणाले. 

दिशा सालियन प्रकरणाचा का तपास केला जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या श्रावणबाळनं काय दिवे लावलेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.  आज सत्ता आहे, उद्या परिवर्तन होईल. त्यामुळे संयमानं बोला असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. 

पक्षांतर हा आमचा प्रश्न आहे. ३९ वर्षे आम्ही त्यांच्यासोबतच होतो. अंगावर आल्यावर शिंगावर कसं घ्यायचं हे आम्हाला देखील माहिती असल्याचे ते म्हणाले. सरकारं पाडावं अशी त्यांची इच्छा असेल तर मी वरिष्ठांशी बोलतो असेही राणे म्हणाले. 

काय आहे प्रकरण ?

मुख्यमंत्र्यांनी 'बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला' ही गोष्ट सांगत नारायण राणेंची तुलना बेडकाशी केली होती. ”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं' असे उद्धव ठाकरे दसरा  मेळाव्यात म्हणाले. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरेंनी नारायण राणेंवर केली.