खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया विधानसभा निवडणुक लढवणार? मतदार संघ कोणता? तिकीट कोण देणार?

भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 17, 2024, 06:40 PM IST
खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया विधानसभा निवडणुक लढवणार? मतदार संघ कोणता? तिकीट कोण देणार? title=

 Sreejaya Ashok Chavan :  चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात येण्याची शक्यता आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल आहे. श्रीजया चव्हाण या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच श्रीजया यांचा राजकारणात सहभाग पहायला मिळाला. मात्र, आता त्यांचे वडिल अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रेवश केला आहे. यामुळे  श्रीजया कोणत्या पक्षातून निवडणुक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण या लढण्यासाठी इच्छूक आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भोकर मतदारसंघात 926 कोटी रुपयांच्या विकासकामाचं उद्घाटन करण्यात आलंय.. या उद्घाटन सोहळ्यातून श्रीजया चव्हाणांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटलेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना सहकार्य करण्याचं आवाहन केले. 

काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात श्रीजया अशोक चव्हाण या सहभागी झाल्या होत्या.   पहिल्यांदाच भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, यांच्या नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. यानंतर आता श्रीजया चव्हाण राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.  अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया या दोन मुली आहेत.  

श्रीजया चव्हाण या राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.  भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजया चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावं लागले होते. त्यांना अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरी मध्ये मराठा युवकांनी अडवल्याचा प्रकार समोर आला होता.